Description
आपल्या भारतभूमीमध्ये जन्मलेल्या अनेक उत्तुंग व्यक्तिमत्त्वांची मालिकाच महर्षी व्यासांनी ‘महाभारत’ या ग्रंथाद्वारे आपल्यापुढे ठेवली आहे. अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वांच्या मांदियाळीत भगवान श्रीकृष्णांच्या नंतर आपल्या मन:पटलावर उभे राहतात ते पितामह भीष्म. ज्या एका सद्गुणामुळेच एखाद्या व्यक्तीचे नाव अखिल विश्वामध्ये प्रसिद्ध व्हावे अशा अनेक सद्गुणांची जणू खाणच असलेल्या देवव्रत भीष्मांचा गौरव ‘तुझ्या समान गुणांनी युक्त पुरुष या पृथ्वीवर मी न पाहिला आहे न ऐकला आहे’ या शब्दांत साक्षात भगवान श्रीकृष्ण करतात. नियतीचे चार-दोन फटके खाऊनच परास्त होऊन दैवाला दोष देत सतत रडगाणी गाणार्या सर्वसामान्यांसाठी भीष्म पितामह पुरुषार्थाचा एक तेज:पुंज आदर्शच आहे. त्यांचा अतुलनीय पराक्रम, त्यांचे आत्मज्ञान, धर्मज्ञान, त्यांची श्रीकृष्णांबद्दलची ‘पराभक्ती’, त्यांची विनयशीलता ह्या महनीय गुणांनी युक्त असलेले पितामह भीष्म समस्त धर्मेतिहासांत अजरामर झाले आहेत. भीष्माचार्यांवर लादलेल्या अनेक आक्षेपांचे साधार निराकरण ‘महाभारता’तील महर्षी व्यासांच्या श्लोकांच्या आधारेच लेखकांनी केलेले आहे. त्यामुळे भीष्माचार्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक देदीप्यमान होते. सत्य, ब्रह्मचर्य, तप, निष्ठा, संयम, पुरुषार्थ या आणि अशा इतर अनेक नीतिमूल्यांची प्रचंड घसरण प्रतिदिनी अधिकाधिक होत चाललेल्या आपल्या आधुनिक समाजाला भीष्म पितामहांची खरी ओळख करून देणारे हे पुस्तक आहे.
Contributors : S. M. Kulkarni









